#COVID19: बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था तातडीने करणार : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/21.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था तातडीने करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी अटल आहार योजने अंतर्गत बांधकाम सुरू असेलल्या ठिकाणी दुपारी १२ ते २.३० या कालावधीत मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येते. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतील नोंदीत बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने सदर योजनेअंतर्गत होणाऱ्या भोजन वितरणाची कार्यवाही थांबवण्यात आली होती. मात्र, बांधकाम ठिकाणी काम करणारे बहुतांश कामगार अन्य जिल्हातील अथवा उत्तर प्रदेश, बिहार अश्या परराज्यातील असल्याने व वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे त्यांना गावी जाता येत नसल्याने अशा नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांची नोंदणीस अधीन राहून भोजना व्यवस्था तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी दिली. त्यासाठी या पाचही शहरांत अडकलेल्या बांधकाम कामगारांचा आढावा घेण्याचे निर्देश कामगार मंत्र्यांनी दिले आहेत.