#CoronaVirus: “वानखेडे मैदान ताब्यात घेणार नाही”, महापालिका आयुक्तांनी केलं स्पष्ट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Wankhede-Stadium.jpg)
क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेतलं जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. मुंबईतील कोणतंच मैदान ताब्यात घेतलं जाणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महापौर किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडिअमला भेट देत मैदानाची पाहणी केली होती. सोबतच वानखेडे परिसरातील नागरिकांनी मैदानात क्वारंटाइन सेंटर उभारण्यास विरोध केला होता. त्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी असा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं आहे.
इक्बाल सिंग चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “वानखेडे ताब्यात घेतलं जाणार असल्याच्या बातम्या पाहून मला आश्चर्य वाटलं. जर खुली मैदानं घेतली आणि पाऊस पडला तर चिखल होईल. चिखल झाल्यानंतर खूप अडचण निर्माण होतील. आपल्याकडे मोठे पार्किंग आहेत ते वापरु शकतो. मैदानात इतके मोठे मंडप उभारु शकत नाही. त्यामुळे असा कोणताही निर्णय़ घेतलेला नाही. कोणतंही मैदान ताब्यात घेतलं जाणार नाही”.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडिअमसोबत ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात घेतलं जावं अशी मागणी ट्विटरवरुन केली होती. त्यांच्या या मागणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना हे शक्य नसल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मागणीला विरोध करत ट्विटरवरुन उत्तर देताना सांगितलं की, “आपण स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदानं असल्याने तिथे पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाइनसाठी टणक पृष्ठभूमीची गरज असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत”. यामुळे मैदानात ताब्यात घेतली जाणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.
मुंबईत डबलिंग रेट १४.५ झाला असून ही दिलासादायक बातमी असल्याचं इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं आहे. इक्बाल सिंग चहल यांनी यावेळी लॉकडाउन वाढवला असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे असंही म्हटलं आहे. लॉकडाउन वाढवला आहे तर सर्व नागरिकांनी आतापर्यंत जेवढं सहकार्य केलं आहे, मदत केली आहे ती वाया जाऊ देऊ नये असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. आपल्याला यश मिळणार हे नक्की आहे, त्यामुळे तडजोड करु नका असंही ते म्हणाले.