#CoronaVirus | जळगावमध्ये दोन करोना संशयितांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona-virus-2-3-2.jpg)
जळगाव | जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या दोन करोना संशयितांचा रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. या दोन्ही संशयितांचे रिपोर्ट आल्यानंतरच ते करोनाचे रुग्ण होते की नाही हे स्पष्ट होणार असले तरी एकावेळी दोन संशयितांचे मृत्यू झाल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
करोनाची लक्षणे आढळल्याने या दोन्ही रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. या संशयितांचे स्वॅब कालच तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. परंतु, अद्याप तपासणी अहवाल प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करता येत नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात येत आहे. तसेच तपासणी अहवाल येण्याची वाट न पाहता त्याच्या संपर्कातील इतर लोकांचा शोध घेतला जात आहे.