CoronaVirus : आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात संचारबंदी लागू – पंतप्रधान नरेंद्र मोदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Narendra-Modi-15-1.jpg)
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच रुग्णांचा आकडा आज 519 वर पोहोचला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केलं आहे. आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पुढचे 21 दिवस कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.
कोरोनाशी लढायचं असेल तर सोशल डिस्टसिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरात राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. घरात थांबणं हे फक्त रुग्णच नाही तर प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
असंच दुर्लक्ष होत राहिलं तर भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागले. त्याचा अंदाज करणंही शक्य नाही. सगळ्यांनी सरकारच्या सूचनांचं पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांचा आकडा आज 519 वर पोहोचला अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 107 तर केरळमध्ये 87 जणांचा समावेश आहे. संख्या वाढत असल्याने जवळपास सर्वच राज्यांनी लॉकडाउन केलं असून अनेक राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.