TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिटी लिंकची सेवा ठप्प ; झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

नाशिक : विविध मागण्यांसाठी गुरूवारी सकाळी महापालिकेच्या सिटी लिंक बससेवेतील वाहकांनी अकस्मात पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल झाले. मनपाचे धोरण अतिशय जाचक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ऐन गणेशोत्सवात सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाल्यामुळे कंपनीने तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे चार, पाच तासांनंतर ही सेवा पूर्ववत झाली. बस सेवा बंद राहिल्याने प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल सिटी लिंक प्रशासनाला माफी मागण्याची वेळ आली.

शहरात गेल्या वर्षी जुलैमध्ये मनपाने सिटी लिंक शहर बस सेवा सुरू केली. सकाळच्या सत्रात २०० तर दुपारच्या सत्रात २०० अशा प्रकारे सुमारे ४०० बस चालविल्या जातात. या सेवेत दर महिन्याला कोटय़वधींचा तोटा होत आहे. त्यामुळे महापालिकेने तो कमी करण्यासाठी कठोर धोरण अवलंबले आहे. तिकीट काढण्यास विलंब झाल्यास अथवा गर्दीत काढता न आल्यास वाहकाला जबाबदार धरले जाते. अशा अनेक बाबींसाठी तीन ते पाच हजार रुपये दंड केला जातो.

प्रसंगी निलंबनाची कारवाई केली जाते. या प्रकारे आतापर्यंत ६५ वाहकांना निलंबित करण्यात आल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. या बाबत अनेकदा दाद मागूनही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने वाहकांनी अकस्मात कामबंद आंदोलन सुर केले. त्यामुळे नाशिकरोड व पंचवटी आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. ठिकठिकाणी थांब्यावर बसची प्रतीक्षा करणाऱ्यांना बराच वेळ तिष्ठत रहावे लागले. या आंदोलनाची माहिती समजल्यानंतर त्यांना रिक्षा व अन्य साधनांनी मार्गक्रमण करावे लागले. सिटी लिंकची सेवा बंद झाल्यामुळे रिक्षाचालकांनी भाडय़ापोटी अवाच्या सव्वा रुपये उकळले. शाळा, महाविद्यालयात निघालेले विद्यार्थी, नोकरदार अशा सर्वाना बस सेवा बंद झाल्याचा फटका बसला.

सिटी लिंकच्या वाहकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक काम बंद आंदोलन पुकारले. अत्यावश्यक सेवेतील कामकाज बंद करत पुकारलेले आंदोलन बेकायदेशीर आहे. तरीदेखील वरिष्ठ पातळीवरून चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. शहर बस सेवा सकाळी दहापासून पूर्ववत करण्यात आल्याचे नाशिक महानगर परिवहन महामंडळाने म्हटले आहे. काही काळ बससेवा बंद राहिल्याने प्रवाश्यांच्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button