विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस वाढली; पृथ्वीराज चव्हाणांची मैदानात उडी!
![Churas for the post of Assembly Speaker; Prithviraj Chavan jumps on the field!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/pruthiviraj-chauhan-sangram-thopate-1.jpg)
पुणे । प्रतिनिधी
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे भोर-वेल्हा- मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या स्पर्धेत उडी घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. राज्यात कोरोनाचे सावट अजूनही कायम आहे. त्यामुळे, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन लवकरात लवकर उरकण्याचा सरकारचा मानस आहे. तरीही कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरणार आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, सुरेश वरपूडकर, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. वरपूडकर हे काँग्रेसचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आहेत. तर थोपटे यांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीचा विरोध?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अभ्यासू नेतृत्व आहे. राष्ट्रवादी तसेच शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना वेसण घालण्याचे काम उत्तम पद्धतीने करु शकतील, असा काँग्रेस नेत्यांचा होरा आहे. मात्र, चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून विरोध होवू शकतो.