“विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करावी”
![Chief Minister Uddhav Thackeray should expel Vijay Vadettiwar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Chitra-Wagh-Vijay-Wadettiwar.jpg)
रत्नागिरी – मराठा आरक्षणाच्या मुद्यासह सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पेटत आहे. त्यातच आता धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झालेले दिसत आहे. भाजपने या निवडणुकीत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आणि ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. या शासनाने जनहिताचे एकही काम केलेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर बोलतच नाहीत व बोलणारे मंत्री विजय वडेट्टीवार फसवणूक करत आहेत, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार दररोज विधाने बदलत आहेत त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे फसवे, कामचुकार मंत्री वडेट्टीवार यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, अशा कडक शब्दात त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केलीये. भाजप नेत्या चित्रा वाघ गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही. निवडणुकीच्या निर्णयाला सरकारने स्थगिती द्यावी. अन्यथा ओबीसींच्या रोषाला सामोरं जावं, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. तर या सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु आहे, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.