टाळ्या अन् टोलेवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा पलटवार
![Chief Minister-Deputy Chief Minister's counter attack on clapping and applause](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/ajit-dada-Tole-talya.jpg)
नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात विधानसभेमध्ये जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसयांच्यासाठी सभागृहात टाळ्या वाजवल्या जातात, पण एकनाथ शिंदेंसाठी टाळ्या वाजवल्या जात नाहीत, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यावर फडणवीस आणि शिंदे यांनी पलटवार केला. आमच्यात फूट पाडू नका, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारावरून टोला
‘मंत्रिमंडळ विस्तार करा आणि त्यात महिलांना स्थान द्या. तुम्ही घाबरू नका. 43 जागा भरल्या की राहिलेले आमदार निघून जातील का? अजिबात जाणार नाहीत. काळजीच करू नका,’ असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या टोल्यावर फडणवीसांनी प्रतीटोला हाणला. आता पहिले मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांनाच स्थान देणार आहोत, त्यामुळे कुणीही कोट शिवला असेल तर त्याचा उपयोग नाही, असं फडणवीस म्हणाले.
टाळ्यांवरून दादांची बॅटिंग
‘ज्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते त्यावेळी एकही भाजपवाला टाळ्या वाजवत नव्हता. तानाजीरावांनी आमच्याच लोकांना टाळ्या वाजवायला सांगितलं. फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते, करोडो रुपयांचे प्रस्ताव मांडले, तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, असा निशाणा अजित पवारांनी साधला. अजित पवारांच्या या निशाण्यावर फडणवीस यांनी त्यांना महाविकासआघाडी सरकारची आठवण करून दिली. तुमच्यावेळी राष्ट्रवादीचा मंत्री उत्तर देणार असेल तर फक्त राष्ट्रवादीचेच आमदार बसायचे, बाकी दोन पक्षांचे आमदार बाहेर असायचे, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांना टाळ्यांच्या मुद्द्यावरून उत्तर दिलं. माझं उपमुख्यमंत्र्यांच्या हाताकडेही लक्ष होतं, ते बरोबर वाजतवत होते. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी, बाहेर जे काही सुरू आहे. कुठली प्रकरणं कुणी दिली? याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही, असं विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘तुम्ही मुख्यमंत्री आहात, मान्यता घेतो आणि प्रस्ताव पाठवतो असं म्हणता. हे मी करणार, असं सांगा ना. कॅबिनेटमध्ये पाठवतो का सांगता, मी कॅबिनेटमध्ये करून घेणार सांगा. लोकांमध्ये संदेश गेला पाहिजे. हे महाराज उपमुख्यमंत्री असताना रेटून बोलत आहेत. तुम्ही मात्र मागे मागेच येत आहात,’ अशी टीका अजित पवारांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, यात तुम्हाला यश येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.