‘सोलापूर कमी, माढ्याची जागा भाजपसाठी कठीण’; चंद्रकांत पाटलांची कबुली
![Chandrakant Patil said that Madha seat is difficult for BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Chandrakant-Patil-1-1-780x470.jpg)
पुणे | माढा लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. माढ्यात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. यातच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. भाजपसाठी सोलापूरची निवडणूक थोडीशी कठीण आहे, मात्र माढा लोकसभेची निवडणूक जरा जास्तच कठीण असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात चंद्रकांत पाटील यांनी आमदार समाधान आवताडे आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी आयोजित केलेल्या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी हजेरी लावली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलापूरची निवडणूक थोडीशी कठीण आहे. माढ्याची निवडणूक यापूर्वी कठीण नव्हती. मात्र, आता ती कठीण झाल्याचं वाटत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची कामाला लागावे. महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा एकाही जागा कमी मिळणार नाही. ज्या तीन जागा अडचणीच्या वाटतात, त्यादेखील मिळवण्याचा प्रयत्न करू.
हेही वाचा – ‘वडीलधाऱ्यांनी असं बोलल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते’; अजित पवार कडाडले
दरम्यान, भाजपनं माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिल्यानंतर अकलूजचे मोहिते-पाटील नाराज झाले होते. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, निंबाळकर यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर मोहिते-पाटलांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. लागलीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे माढ्यात मोहिते-पाटील विरुद्ध नाईक-निंबाळकर, अशी रंगतदार लढाई होणार आहे.