दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान
![Confusion of health department exams, papers in two districts on the same day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/exam.jpg)
मुंबई – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देत राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका, असे म्हणत प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
दहावीचा निकाल वेगवेगळा फॉर्म्युला वापरून लावला तर अकरावीच्या प्रवेशाबाबत गोंधळ उडेल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या एसएससी बोर्डाच्या आणि अन्य बोर्डांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून दहावीची परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. धंनजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केली असून आता न्यायालय यावर काय निर्णय देते याकडे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.