वसईतील स्वयंघोषित धर्मगुरूवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, आरोपी फरार

मुंबई | वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांच्याविरोधात महादेवाचा अवतार असल्याचा बनाव करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वसई-विरार परिसरासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यातील ३५ वर्षीय महिलेने वैद्य याच्यावर गंभीर आरोप केले असून, महादेवाचा अवतार असल्याचे सांगत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे.
हेही वाचा : पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका, सरकारचे स्पष्टीकरण
दरम्यान, या प्रकरणात गंभीर आरोप होत असतानाच ऋषिकेश वैद्य याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. “लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते,” असे म्हणत त्याने सर्व आरोप फेटाळले आहेत.
माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ऋषिकेश वैद्य हा फरार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी वसईच्या निवास स्थानी धाड टाकली असता तेथेही तो मिळून आला नाही. तर पुणे पोलिसाकडूनही त्याचा शोध सुरू आहे.





