भाजपा आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार
![भाजपा आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/ashish-shelar.jpg)
मुंबई |
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी देण्यात येत आहे. शेलार यांना अज्ञात इसम धमकी देत असून शिविगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे. नवभारत टाइम्सने याबद्दल सविस्तर वृत्त दिलं आहे.
यापूर्वी एकदा २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर त्यापूर्वी आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची दहशतवाद्यांनी रेकी केल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा दहशतवाद्यांकडून नागपूरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.