विधिमंडळातील निलंबनाच्या घोषणा मागे घेण्याचे बावनकुळे यांचे आश्वासन; महसूल कर्मचार्यांचा संप तूर्तास स्थगित…

छत्रपती संभाजीनगर : पालघर आणि मावळमधील प्रकरणात विधिमंडळात जाहीर केलेले निलंबन मागे घेण्यात येतील असे आश्वासन देत महसूल कर्मचारी संघटनेसमोर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माघार घेतली. त्यामुळे महसूल महासंघाकडून पुकारण्यात आलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर आणि महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी, मंडळाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष विजय टेकाळे यांनी आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आल्याचे कळविले आहे.
मावळ प्रकरणातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन तीन दिवसात मागे घेतले जाईल त्यासाठी विभागीय आयुक्तांचा अहवाल मागविला जाणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये जिल्हास्तरील झालेल्या गौण खनिज विषयक सर्व कारवाया मागे घेतल्या जातील, असे आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. तसेच पालघरमधील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात येतील, असेही आश्वासित करण्यात आले.
हेही वाचा – अकोल्यासह राज्यात ३ उदंचन जलविद्युत प्रकल्प; ५८०० मेगावॉट क्षमता, २३८०० कोटींची गुंतवणूक
नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी यांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तसेच वेतन त्रुटी समितीने फेटाळल्या होत्या. त्याचा विशेष प्रस्ताव महसूल विभागाकडून मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. महसूल कर्मचारी संघटनेबरोबर झालेल्या बैठकीत घाऊक निलंबने मागे घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. विधिमंडळातील निलंबनाच्या घोषणा मागे घेण्याची नामुष्की महसूल मंत्र्यांवर ओढावली.
पोलीस विभागाच्या धर्तीवर नायब तहसीलदार पदासाठी महसूल विभगांतर्गत परीक्षाही घेतल्या जाणार आहेत. या शिवाय अन्य मागण्यावर महसूल मंत्र्यांनी सकारात्मकता दाखविल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घाऊक निलंबनाच्या घोषणा व करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात येईल असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले आहे. त्यामुळे शुकवारपासून होणारे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





