अकोल्यासह राज्यात ३ उदंचन जलविद्युत प्रकल्प; ५८०० मेगावॉट क्षमता, २३८०० कोटींची गुंतवणूक

अकोले: अकोल्यातील २०० मेगावॉट क्षमतेसह पश्चिम घाट (५२०० मेगावॉट) व कोयना टप्पा-६ (४०० मेगावॉट) अशा एकूण तीन उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे सामंजस्य करार राज्य सरकारने नुकतेच केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि तीन कंपन्यांमध्ये उदंचन (पंपस्टोरेज) जलविद्युत प्रकल्पासाठी हे सामंजस्य करार करण्यात आले. या तीनही प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता ५८०० मेगावॉट, गुंतवणूक २३ हजार ८०० कोटी आणि एकूण रोजगार निर्मिती ११ हजार ५०० एव्हढी आहे.
पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प (पुणे व रायगड), कोयना टप्पा -६ उदंचन जलविद्युत प्रकल्प (पाटण) या बरोबरच अकोले (अहिल्यानगर) तालुक्यातील २०० मेगावॉट क्षमतेच्या सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पाचाही त्यामध्ये समावेश आहे. न्यू एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि. ही कंपनी अकोले तालुक्यातील प्रकल्पाची उभारणी करणार आहे.
जीएसडब्लू निओ एनर्जी लिमिटेडच्या पश्चिमघाट उदंचन जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ५२०० मेगावॉट आहे. महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या कोयना टप्पा-६ उदंचन जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ४०० मेगावॉट आहे तर न्यू एशियन इन्फ्रास्टकचर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता २०० मेगावॉट आहे.
हेही वाचा – अपप्रवृत्तीच्या लोकांना पक्षात स्थान देऊन पक्ष प्रतिमा व पक्षाच्या परंपरेला गालबोट लावून देऊ नका..!
राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी आतापर्यंत ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे ७६ हजार ११५ मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. त्यासाठी ४ लाख ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १.२५ लाख मनुष्यबळ रोजगाराची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राधाकृष्ण विखे यावेळी उपस्थित होते.
सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी १ हजार ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामधून २ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. याच कंपनीच्या वतीने अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या पायथ्याशी ७ मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. निळवंडे धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर ही वीजनिर्मिती केली जाते तसेच निळवंडे कालव्याच्या मुखाशी ४.६ मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे.




