मुंबईत सहा वाजण्यापूर्वी १३५ मशिदींची भोंग्यावरुन अजान; पोलीस कारवाई करणार
![मुंबईत सहा वाजण्यापूर्वी १३५ मशिदींची भोंग्यावरुन अजान; पोलीस कारवाई करणार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/मुंबईत-सहा-वाजण्यापूर्वी-१३५-मशिदींची-भोंग्यावरुन-अजान-पोलीस-कारवाई-करणार.jpg)
मुंबई |
मनेस अध्यक्ष राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर राज्यात आज अनेक ठिकाणी पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना झाली. मात्र, मुंबईत काही ठिकाणी मशिदींवरील भोंगे सुरूच होते. त्यापार्श्वभूमीवर आता गृहमंत्र्यालयाने अशा १३५ मशिदींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील अनेक मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळत आज पहाटेच्या पहिल्या आजानवेळी भोंगे बंद ठेवले.
मात्र, काहींनी आदेश न जुमानता भोंग्यांवरून अजान दिली. यावर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यालयाने दिले आहे. मुंबईत एकूण १,१४० मशिदी आहेत. ज्यापैकी १३५ मशिदींनी आज सकाळी ६ वाजेपूर्वी आधी लाऊडस्पीकरचा वापर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात गेलेल्या या १३५ मशिदींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं महाराष्ट्र गृह विभागाने सांगितले आहे.
- मशिदींवरील भोंग्यांवरुन राज ठाकरे आक्रमक
मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेतल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंगळवारी (३ मे) रात्रीपासूनच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. तसेच, मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची कारवाईही सुरू झाली होती. पोलिसांनी मशिदीतील लोकांशी बोलून अजानवेळी सर्वोच्च न्यायालयाचे नियम पाळण्याचे आवाहन केले.