”जो पर्यंत लेखी आश्वासन देत नाहीत…तोपर्यंत उपोषण कायम राहणार”; लक्ष्मण हाके
लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा 9 वा दिवस, राज्य सरकारच्या शिष्ट मंडळाची आंदोलकांना भेट
!["Until written assurances are given... the hunger strike will continue"; Call Laxman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/HAKE-780x470.jpg)
जालनाः वडीगोद्री येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत आहेत. आज राज्यसरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशिवाय गिरीश महाजन, संदिपान भुमरे, अतुल सावे आणि उदय सामंत हे आंदोलनस्थळी उपस्थित होते.
मुंबईत आज बैठक :
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. आज सायंकाळी मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आता या बैठकीमध्ये काय चर्चा होणार? सरकार काय निर्णय घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही :
”कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच सरकारची भूमिका असून या भूमिकेत कधीही बदल होणार नाही. सरकारच्या भूमिकेवर विश्वास ठेवून उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावं, तसंच महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करावं, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यावेळी केली.”
आंदोलन सुरूच राहील :
13 जूनपासून उपोषण करत असलेल्या हाके आणि वाघमारे यांनी त्यांचं आंदोलन थांबविण्यास नकार दिलाय. ओबीसी कोटा कमी केला जाणार नाही, असं लेखी आश्वासन देण्याची मागणी हाके आणि वाघमारे यांनी केलीय. जोपर्यंत सरकार ओबीसी आरक्षणाला बाधा पोहोचणार नाही असं लेखी देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असंही नवनाथ वाघमारे म्हणाले.
जरांगे पाटील यांच्यावर आरोप :
मुंबईतील बैठकीला धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर आणि विजय वडेट्टीवार या प्रमुख ओबीसी नेत्यांनीही उपस्थित राहावं, असं ते म्हणाले. कार्यकर्ते जरांगे पाटील यांनी निर्माण केलेल्या गोंधळामुळं मराठा समाजातील तरुण आपलं जीवन संपवत असल्याचा आरोप गुरुवारी हाके आणि वाघमारे यांनी केला होता.