दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून एका चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
![An unfortunate death of a four-year-old girl due to the shock of the ice cream freezer in the shop](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/CCTV-Nashik-Girl.jpg)
नाशिक | दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून एका चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको भागात घडली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. आईस्क्रीम आणण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या या मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचं नावं ग्रीष्मा असं आहे. ग्रीष्मा ही तिचे वडील विशाल कुलकर्णी यांच्यासोबत आईस्क्रीम आणायला घराजवळच्या दुकानात गेली होती. त्रिमूर्ती चौक परिसरामधील मातोश्री चौक येथील दुकानाजवळ घडली. ग्रीष्मा वडिलांसोबत आईस्क्रीम आणण्यासाठी दुकानात पोहचल्यानंतर तिचे वडील आईस्क्रीमच्या फ्रीजमध्ये डोकावून पाहताना दुकानदाराशी बोलता बोलता दुसऱ्या बाजूला गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ग्रीष्मा मात्र दुसऱ्या बाजूला त्या फ्रीजलाच खेटून आतमधील आईस्क्रीम पाहण्याचा प्रयत्न करत होती.
ग्रीष्माचे वडील फोनवर बोलत असताना अचानक ग्रीष्माची हालचाल मंदावली आणि ती बराच वेळ आहे त्या स्थितीत उभी असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. जवळजवळ मिनिटभर ग्रीष्मा फ्रीजवर हात ठेऊन लटकल्याप्रमाणे उभी होती. त्यानंतर ग्रीष्माच्या वडिलांनी फोन ठेवला त्यानंतर ते पुन्हा बोलू लागले आणि आईस्क्रीम काढण्यासाठी फ्रीज उघडला तेव्हा ग्रीष्मा खाली पडली. लगेच विशाल यांनी ग्रीष्माला उचललं मात्र तोपर्यंत तिची हलचाल पूर्णपणे मंदावली होती. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सीसीटीव्हीमधील वेळेनुसार १ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून २७ मिनिटांनी हा सर्व प्रकार घडला.
सदर घटनेबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पालकांनी बाहेर गेल्यावर आपल्या पाल्यावर लक्ष ठेवावे जेणेकरून अशा दुर्घटना घडणार नाही, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.