भाचीच्या वाढदिवसाला आलेल्या मामाचा प्रताप; अवघ्या तीन दिवसांत केल्या सहा घरफोड्या
![An uncle's grandeur at his niece's birthday; Six burglaries were committed in just three days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/An-uncles-grandeur.jpg)
उल्हासनगर | भाचीच्या वाढदिवसाला आलेल्या मामाने तीन सहकाऱ्यांच्या मदतीने तीन दिवसांत सहा घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बाबू जाधव यांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नेवाळी गावातील चाळीतून चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा घरफोड्यांमध्ये चोरी केलेले साडे बारा लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा नांदेडचा असलेला राजू मिरे हा नेवाळी येथे बहिणीच्या घरी आला होता. तिथे त्याने त्याचा सहकारी परमेश्वर गायकवाड, प्रकाश पवार आणि एका अल्पवयीन सहकाऱ्यांच्या मदतीने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केली. अवघ्या तीन दिवसांत सहा घरफोड्या झाल्याने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक आयुक्त जगदीश सातव, मोतीचंद राठोड यांनी स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींना गजाआड करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, ज्ञानेश्वर माळी, पोलीस हवालदार अजय गायकवाड, पोलीस नाईक प्रमोद कांबळे, चंदू शिंदे, गौतम कारकुड, बाबू जाधव, सुभाष घाडगे, नवनाथ काळे यांना तपासाचे आदेश दिले. संबंधित आरोपी हे नेवाळी गावात राहत असल्याची गुप्त माहिती बाबू जाधव यांना मिळाली. माहिती तपासल्यानंतर पोलीस पथकाने नेवाळी गावातील चाळीत धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली.
दरम्यान, आरोपी चोरी करण्यासाठी दिवसा फिरून घर निवडायचे, त्यानंतर रात्रीच्या वेळी चोरी करायचे. आरोपींपैकी राजू मिरे याच्याविरुद्ध तेलंगणा राज्यात सात गुन्हे आणि परमेश्वर गायकवाड याच्याविरोधात नांदेड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी दिली आहे.