शिवरायांचा महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे; अजित पवारांनी गृहमंत्र्यांचे कान टोचले

Ajit Pawar | पुण्यात स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीला शिताफीने पकडण्यात आले आहे. त्याला योग्य ती शिक्षा होईलच; परंतु त्याच्यात ही विकृती आली कशी, याचा विचार केला पाहिजे. शिवराय, फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात महिला-भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कर्तव्य बजावावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम टोचले.
अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्र हा नेहमीच सुसंस्कृत राहिला आहे. विरोधकांना देखील सन्मानाने वागवण्याची आपली परंपरा आहे. कालच मराठी भाषा दिन साजरा झाला. प्रत्येक मराठी माणूस विचाराने कोणीही असला तरी तो महाराष्ट्राच्या हिताचाच विचार करणार, याची खूणगाठ प्रत्येकाने कायम मनाशी बांधली पाहिजे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांचा अभिमान ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ चे पाद्यपूजन
३ मार्च रोजी विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होते आहे. यात दि. १० रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. विरोधक लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत आहेत. परंतु लाडक्या बहिणींसह सर्व समाजघटकांना मी आश्वस्त करतो की, गरीबांच्या हिताच्या कोणत्याही योजना बंद पडणार नाहीत. जे लोक आपल्या उत्पन्नातून कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नाहीत, त्यांच्या मदतीसाठी सरकारचे प्रयोजन असते आणि सरकार आपले कर्तव्य चोखपणे बजावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजू समाज घटकांसाठी असंख्य योजना राबवत आहेत. कोट्यवधी लोकांना घरकुल देण्यात आले. तरुणांना रोजगार देणाऱ्या अनेक योजना आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार काम करत आहे, असं अजित पवार म्हणाले.
राजकारणातील लोकांचे पाय कायम जमिनीवर राहिले पाहिजेत. लोकशाहीत जनता जनार्दन सर्वस्व आहे. विनाकारण मुंबईत हेलपाटे मारु नका, त्यापेक्षा लोकांच्या संपर्कात राहा, त्यांची कामे करा तरच पक्ष वाढेल. सर्व समाज घटकांकडे सारख्या नजरेने पाहिले पाहिजे. सर्वांची कामे आपल्या माध्यमातून व्हावीत, असंही अजित पवार म्हणाले.