आदित्य ठाकरेंनी रात्री ११ वाजता केली रंकाळा तलावाची पाहणी
![Aditya Thackeray inspected Rankala Lake at 11 pm](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/aaditya.jpg)
कोल्हापूर | प्रतिनिधी
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असताना काल रविवारी रात्री चक्क ११ वाजण्याच्या सुमारास रंकाळा तलावाची पाहणी करून त्यांनी विकास कामाचा आढावा घेतला. त्याआधी दुपारी त्यांनी शिरोळमधील नृसिंहवाडी येथील श्री दत्ताचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार राजेश क्षिरसागर, आदी उपस्थित होते.
नुकतेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार त्यांनी रात्री उशिरा रंकाळा तलावाच्या विकासासाठी सुरू असणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटले की, दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशातून कोल्हापुरात येत असतात, त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करणे तसेच जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक प्रकल्पांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. शिवाय कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळ्याला अधिक सुंदर बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही म्हटले.