खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस चौकीतून पळाला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/rajkumar-gupta.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी हातात घातलेली बेडी काढून, पोलीस चौकीतून पोलिसांची नजर चुकवून पळाला. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी पावणे पाच वाजता वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत घडली.
राजकुमार रोहित गुप्ता (वय 34, रा. संभाजीनगर, आकुर्डी. मूळ रा. बिहार) असे पोलीस चौकीतून पळालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास मडके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमार याच्यावर एप्रिल 2021 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 10 डिसेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राजकुमार याला पिंपरी पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी (दि. 8) त्याला पिंपरी लॉकअप मधून चौकशीसाठी वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत आणण्यात आले होते.
दरम्यान, पोलीस चौकीत राजकुमारने जीव गुदमरल्याचा आणि उलटी आल्याचा बहाणा केला आणि चौकीच्या बाहेर आला. त्याने पोलिसांची नजर चुकवून त्याच्या हातातील बेडी काढून ती चौकीतल्या बाकावर ठेवली आणि पळून गेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.