पुण्यात गणेशोत्सवात डीडेच्या लेझर लाईटमुळं तरूणाला अंधत्व
पुणे : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या लेझर लाईटमुळे एका तरूणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा होऊन त्याला काही अंशी अंधत्व आले आहे.
जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या अनिकेत (वय. २३) असं अंध झालेल्या तरूणाचे नाव आहे. अनिकेत मिरवणुकीच्या दिवशी पर्वती पायथा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. नाचत असताना डिजेवरील हिरवा लेजर लाईट त्याच्या एका डोळ्यावर पडला. यावेळी त्याला डोळ्याला काही वेदना किंवा आग झाली नाही मात्र याचा त्या डोळ्यावर चांगलाच परिणाम झाल आहे. त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जवळपास ३० टक्क्याने कमी झाली आहे.
हेही वाचा – ‘पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्याचा विकास वेगाने होणार’; अजित गव्हाणे
अनिकेत सिंहगड रस्त्यावरील दूधभाते नेत्रालयात गेला. येथे त्याला नेत्ररोगतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी उपचार केले. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. दूधभाते म्हणाले की, आमचे सेंटर अत्याधुनिक साधनांनी डोळ्याच्या सर्व प्रकारच्या उपचारासाठी सज्ज आहे. अनिकेतच्या डोळ्यावर लेजर लाईट पडल्याने त्याच्या नेत्रपटलावर रेटीनावर बर्न झाले आहे. आता त्याच्यावर उपचार सुरू असून तो बरा होत आहे.