कुडाळच्या रणांगणात ‘तुतारी’चा झंझावात; शिंदे आणि नायकुडेंच्या प्रचाराने महायुतीसमोर तगडे आव्हान!
' भावकी-गावकी'च्या राजकारणात परिवर्तनाचे वारे; 'राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी'च्या जयघोषाने जावळी दुमदुमली

सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०२६ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, जावळी तालुक्यातील कुडाळ गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाकडून जिल्हा परिषदेसाठी सौ. पूनम प्रशांत नायकुडे आणि पंचायत समितीसाठी श्री. राजेंद्र रामचंद्र शिंदे यांनी प्रचाराचा धडाका लावला असून, ‘तुतारी’च्या आवाजाने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
’ अनुभव’ आणि ‘जनसंपर्क’ हीच राजेंद्र शिंदेंची शिदोरी
पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र शिंदे (काका) यांची प्रतिमा एक अभ्यासू आणि लोकाभिमुख नेता अशी आहे. मेढा येथे मुद्रांक विक्रेता म्हणून काम करताना त्यांनी निर्माण केलेला दांडगा जनसंपर्क आणि कुडाळ विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन म्हणून त्यांनी केलेले कार्य ही त्यांची मोठी ताकद ठरत आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांचा दांडगा प्रशासकीय अनुभव निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.
हेही वाचा – ‘भावनांसह निर्माण होणारे संगीत हृदयापर्यंत पोहचते…’; पद्मविभूषण इलायाराजा

चौरंगी लढतीत ‘महाविकास आघाडी’चे पारडे जड
कुडाळ गणात भाजपचे सौरभ शिंदे आणि शिवसेना (उबाठा) चे प्रशांत तरडे रिंगणात असले तरी, खरी लढत ‘कमळ’ विरुद्ध ‘तुतारी’ अशीच रंगणार असल्याचे चित्र आहे. आमदार शशिकांत शिंदे यांची रणनीती आणि दीपक बापू पवार यांचे खंबीर नेतृत्व पाठीशी असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. ‘भावकी-गावकी’च्या समीकरणांना छेद देत यावेळी मतदार परिवर्तनाला साद घालत असल्याचे दिसून येत आहे.
विकासाचा ‘ब्लूप्रिंट’: रस्ते, पाणी आणि रोजगार
प्रचारादरम्यान शिंदे आणि नायकुडे यांनी केवळ आश्वासन न देता ठोस कार्यक्रम मतदारांसमोर मांडला आहे:
पाणी व रस्ते: प्रलंबित रस्ते, वीज समस्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार.
महिला सक्षमीकरण: बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हक्काचे उद्योग उपलब्ध करून देणार.
युवा रोजगार: स्थानिक स्तरावर तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
५ फेब्रुवारीला ‘परिवर्तन’ घडवण्याचे आवाहन
”कुडाळचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सामान्य जनतेचा आवाज सभागृहात पोहोचवण्यासाठी येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर शिक्कामोर्तब करून बहुमताने विजयी करा,” असे आवाहन राजेंद्र शिंदे आणि पूनम नायकुडे यांनी केले आहे.




