सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार; एकनाथ शिंदेंचे ट्विट
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. ज्यानंतर आयोगाने शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिले. यानंतर आज ‘ढाल तलवार’ हे चिन्ह दिल आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत ठाकरे गटाला एकप्रकारे इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांचे ट्विट
आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार…. सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार…. #बाळासाहेबांचीशिवसेना, निशाणी : #ढालतलवार असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने सोमवारी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं. तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव वापरण्यास परवानगी दिली. मात्र शिंदे गटाने दिलेली तीनही चिन्ह अमान्य केली. ज्यानंतर शिंदे गटाला नव्याने तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले, ज्यानुसार शिंदे गटाने आज ढाल तलवार, तळपता सूर्य, पिंपळाचं झाड ही चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवली. यातील शिंदे गटाने तळपता सूर्य या चिन्हाला पसंती दर्शवली होती. मात्र हे चिन्ह मिझोरम राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह असल्याचे ते देण्यास नकार दिला. त्यामुळे निवडणुक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे. मात्र या चिन्हावरूनही दोन्ही गटाला पुन्हा राजकीय संघर्ष पाहयला मिळत आहे. दोन्ही गट एकमेकांना चिन्हाच्या माध्यमातून इशारा देत आहेत.