पुणे पुन्हा हादरलं! बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

पुणे | पुणे पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरलं आहे. कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आता आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची परराज्यातील आहे. तिचा मित्र जळगावमधील आहे. दोघे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले हाेते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. त्यानंतर घाबरलेल्यातरुणीला मित्राने रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा – जिरायत भागाला ओलिताखाली आणण्यासाठी नीरा-कऱ्हा उपसा सिंचन योजना करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती (एमएलसी) मध्यरात्री कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तातडीने तपास करण्याचे आदेश देण्यात आले. शुक्रवारी सकाळी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कार प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दहा पथके रवाना झाली आहेत.