PM किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता लवकरच होणार जमा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, 20व्या हप्त्याची शेतकरी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 किंवा 19 जुलै 2025 रोजी हा हप्ता जारी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहारच्या मोतिहारी दौऱ्यावर असणार आहेत आणि तिथूनच हा हप्ता वितरित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा – वाढवण बंदर आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले e-KYC, बँक खाते तपशील किंवा मोबाईल क्रमांक अपडेट केलेले नाहीत, त्यांनी उर्वरित दोन दिवसांत ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. अन्यथा त्यांना 20 वा हप्ता मिळण्यात अडथळा येऊ शकतो. योजनेच्या लाभाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व दस्तऐवजांची योग्य पडताळणी आणि अद्ययावत माहिती पोर्टलवर नोंदवलेली असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली माहिती लवकरात लवकर अपडेट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या हप्त्याच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपये जमा केले जातील. हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात DBT पद्धतीने दिले जातात.





