10 किंवा 13 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका होतील – जलसंपदामंत्री गिरीष महाजन
नाशिक, – राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. सप्टेंबरमध्ये आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे भाकित फडणवीस सरकारमधील संकटमोचन समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवले आहे. नाशिक येथे रविवारी (14 जुलै) झालेल्या नियोजन बैठकीत गिरीश महाजन यांनी सर्वांचेच लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात हे भाकित वर्तवले आहे. गेल्या निवडणुकीच्या तारखेनुसार विधानसभेच्या तारखेचा अंदाज व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीमुळे होऊ न शकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. 10 किंवा 13 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका होतील. तसेच 10 किंवा 15 सप्टेंबरला आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.