breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

हवाईदलाचे विमान बेपत्ता

चीनच्या हद्दीलगत संपर्क तुटला ; १३ जणांचा शोध सुरू

उड्डाणानंतर काही वेळात भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे विमान सोमवारी आसाममध्ये चीनच्या हद्दीलगत बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान आहेत. दुपारी एक वाजता बेपत्ता झालेल्या या विमानाचा शोध रात्रीही सुरूच होता. ते कोसळल्याचे कोणतेही पुरावे मात्र हाती लागलेले नाहीत.

हे विमान आसामातील जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशात जात होते. अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथील तळावर ते दुपारी दीड वाजता पोहोचणे अपेक्षित होते.

दुपारी १२.२५ वाजता या विमानाने उड्डाण केले आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी दुपारी १ वाजता शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर या विमानाचा काहीच पत्ता नसल्याचे हवाई दलाने सांगितले. या विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लावल्या आहेत. सुखोई-३० या अद्ययावत विमानाद्वारे तसेच सी-१३० या विशेष शोधक विमानाद्वारे या विमानाचा माग घेतला जात आहे. हे विमान कोसळल्याचाही तर्क असला तरी ते ज्या जागी कोसळल्याची शंका आहे तिथे हवाई दल आणि लष्करामार्फत तसेच स्थानिक प्रशासनामार्फत व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. ही शोधमोहीम रात्रीही सुरूच राहील, असे विंग कमांडर रत्नाकर सिंग यांनी जाहीर केले आहे.

मेचुकाचे वैशिष्टय़

*चीनच्या  हद्दीलगत असलेले आणि समुद्रसपाटीपासून १८३० मीटरवर उंचीवर असलेले आणि १९६२च्या युद्धातही मोक्याची अनेक ठिकाणे असल्याने महत्त्वाचे ठरलेले मेचुका हे गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेले स्थान आहे. युद्धजन्य परिस्थितीत हवाई दलाची विमाने उतरवण्याचा हवाई तळ म्हणूनही त्याची ओळख आहे. त्याच्या पुनर्बाधणीचा निर्णय २०१३मध्ये घेण्यात आला आणि ३० महिन्यांत अत्यंत वेगाने हे काम तडीस नेण्यात आले.

*मेचुकाप्रमाणेच याच भागात झिरो आणि आलो हे दोन हवाई तळही कार्यरत करण्यात आले आहेत. मेचुकाचा हा तळ इटानगरपासून ५०० किलोमीटरवर आहे आणि चीनच्या हद्दीपासून अवघ्या २९ किलोमीटरवर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button