सोलापुरातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा मृत्यू, कोरोनामुळे कुटुंबातील तिघांनी गमावला जीव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/पाटील.jpg)
सोलापूर – जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला. राजूबापू पाटील हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. पाटील यांच्या निधनाने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
राजू बापू पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यूसोबतचा संघर्ष अयशस्वी ठरला. दिवंगत यशवंतभाऊ पाटील यांच्या कुटुंबातील कोरोनामुळे हा तिसरा मृत्यू आहे. राजू बापू पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे सभापती पदाच्या माध्यमातून राजू बापू पाटील यांनी आपले वलय निर्माण केले होते. यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती.
राजूबापू यांनी गुळ कारखाना काढून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्या शिफारशीवरून आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांचे वडील दिवंगत यशवंत भाऊ पाटील यांनीदेखील तब्बल 49 वर्षापर्यंत या रयत शिक्षण संस्थेचे सदस्यपद भूषवले होते. एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांना या संस्थेवर संधी देण्यात आली होती.