breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सुशीलकुमार, देवरा यांची उमेदवारीसाठी शिफारस

सात मतदारसंघांत एकच नाव, अशोक चव्हाण यांच्या पत्नीही रिंगणात?

मुंबई : माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुकूल वासनिक व मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता आदी नावांची शिफारस प्रदेश काँग्रेस समितीने लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस समितीला केली आहे. सात मतदारसंघांमध्ये एकाच नावाची शिफारस करण्यात आली असून, काही मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून चुरस आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जिल्हा समित्यांकडून उमेदवारांच्या नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गेल्या वेळी काँग्रेसने लढविलेल्या २६ मतदारसंघांमधील नावांची शिफारस काँग्रेस समितीला करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांना राज्याच्या राजकारणात परतायचे असल्याने त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यात रस नाही. त्याऐवजी चव्हाण यांच्या पत्नीच्या नावाची शिफारस नांदेड काँग्रेसने केली आहे. अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय राहुल गांधी हेच घेतील, असे सांगण्यात आले.

सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), मुकूल वासनिक (रामटेक), विद्यमान खासदार राजीव सातव (हिंगोली), माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे (यवतमाळ), चारुलता टोकस (वर्धा), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) , अमिता चव्हाण (नांदेड) या एकमेव नावांची शिफारस करण्यात आली आहे.

पुण्यात मोहन जोशी व अभय छाजेड, सांगलीत विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील आणि मोहन कदम, शिर्डीमध्ये राजू वाघमारे, भाऊसाहेब कांबळे आणि रुपवते यांची कन्या, नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार यांच्यासह दोन नावांची शिफारस करण्यात आली आहे.

मुंबईत चुरस

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची योजना असली तरी त्यांच्या नावाला मिलिंद देवरा, कृपाशंकर सिंग, नसिम खान आदींनी विरोध दर्शविला. निरुपम यांनी उत्तर मुंबईतूनच लढावे, असा सूर लावण्यात आला. उत्तर – पश्चिममध्ये  सुरेश शेट्टी यांच्या नावाची जिल्हा काँग्रेसने शिफारस केली आहे. उत्तर – मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त यांनी लढण्यास नकार दिला असला तरी त्यांच्याच नावाचा आग्रह स्थानिक काँग्रेसने धरला आहे. बाबा सिद्दिकी, राज बब्बर, हुसेन दलवाई, नगमा यांनीही उमेदवारी मागितली आहे. कृपाशंकर सिंग यांनी उत्तर -पश्चिम मतदारसंघावर दावा केला आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात एकनाथ गायकवाड, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उमेदवारी मागितली आहे.

दोन्ही काँग्रेसचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या घरी 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी लहान-मोठय़ा पक्षांना सोबत घेऊन बांधण्यात येणाऱ्या महाआघाडीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राजगृहावर जाऊन त्यांची भेट घेतली. आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button