सीआरपीएफ जवानाला बारामती पोलिसांनी खोलीत डांबून मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/ingavle-crpf.jpeg)
- जवान अशोक इंगवले यांचा आरोप
पुणे ( महा ई न्यूज ) – पुलवामामध्ये सीआरपीएफ 40 जवानांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली असताना बारामतीत सीआरपीएफ जवानाला पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघकीस आली आहे. पोलिस अधिका-यांनी व कर्मचा-यांनी सीआरपीएफ जवान वर्दीवर असूनही त्याला खोलीत डांबून मारहाण केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यासाठी सीआरपीएफ जवान अशोक इंगवले बारामती पोलिस ठाण्यात आले होते. इंगवले यांनी दुचाकीवर दोन भावांसह एक लहान मुलगाही बसवला होता. त्यामुळे “दुचाकीवरुन ट्रीपल सीट का आलात?” अशी विचारणा करत अशोक इंगवले या सीआरपीएफ जवानाला पोलिसांनी खोलीत डांबून मारहाण केली. विशेष म्हणजे, इंगवले यांच्यासोबत आलेल्या माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केली. 10 ते 15 पोलिसांनी बंद खोलीत डांबून मारहाण केली. तसेच, वर्दीवर असताना बेड्या ठोकल्या, असा आरोप सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांनी केला आहे.
या घटनेमुळं बारामती तालुका पोलिस ठाण्यात युवकांनी गर्दी केली आहे. याबाबत सीसीटीव्ही फुटेज पाहून वस्तुस्थितीनुसार कारवाई करु असं, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, “पोलिसांना जवानांना मारण्याचे अधिकार दिलेत का? दोषींना योग्य धडा मिळाला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नाही. अवैध धंदे चालतात, त्यावर कारवाई करावी ना. चुकीच्या प्रवृत्तीवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. नको तिथे पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर कशासाठी?”, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच, “पोलिसांनी केलेल्या मारहाणीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून, शरमेने मान खाली घालायला लावणारं कृत्य आहे.” अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली.