सात अजस्त्र अजगरांचा संशयास्पद मृत्यू
दापोली – खेड-दापोली मार्गावरील फुरूस जवळील एका जंगलमय भागात सात अजस्त्र अजगरांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना समोर आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. या अजगरांना मारून त्यांना एका खड्डयात गाडून टाकण्यात आले होते.
शनिवारी दुपारी काही वन्यप्रेमींच्या निदर्शनास ही घटना आल्यास त्यांनी तात्काळ वन अधिका-यांना कळवले. एकाच वेळेस सात अजगरांचा मृत्यू नेमका झाला तरी कशाने? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
फुरूस येथील जंगलमय भागात सात अजगर एका खड्डयात पुरून ठेवल्याची बाब वन्यप्रेमी तसेच येथील वनविभागाला कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून हा भागा पिंजून काढला. एका खड्डयात पाला-पाचोळा टाकून पुरून ठेवण्यात आलेले एका मागोमाग सात मृतावस्थेतील अजगर आढळले. घटनास्थळी दगड, काठयादेखील आढळून आल्या असून या वस्तू वनविभागाच्या अधिका-यांनी ताब्यात घेतल्या आहेत. घटनास्थळी पोहचलेल्या वनअधिका-यांनी पंचनामा करून अज्ञातांच्या विरोधात येथील पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.