सर्व सरकारी कार्यालयातील ‘एसी’ सेवा बंद करण्याचे राज्य सरकारचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/AC-2.jpg)
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील वातानुकूलित सेवा म्हणजे एअर कंडिशन सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी या संदर्भातील शासन आदेश दिले आहे…
शासन आदेशात म्हटले आहे की, एसीमुळे कोरोना विषाणूचा सक्रीय राहण्याचा कालावधी वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो कार्यालयातील हवा खेळती राहिली याची काळजी घेण्यास सांगितली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयातील एसी बंद करून खिडक्या उघड्या ठेवाचे आदेश देण्यात आले आहेत…
या संदर्भात १८ मार्चला शासकीय आदेश काढण्यात आला आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण खोकला, शिंकणे यातून हवेत मिसळणाऱ्या आणि पृष्ठभागावर टिकणाऱ्या सूक्ष्म कणांतून होते. जर बाहेरील वातावरण थंड असेल तर या कणांचा सक्रीय राहण्याचा कालावधी जास्त असतो. याचा विचार करून शासकीय कार्यालयात आवश्यक काळजी घ्या. नैसर्गिक हवा खोलीमध्ये येत राहिल, याकडे लक्ष द्या.
राज्यातील सर्व विभागीय कार्यालये, महापालिका, पोलिस आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सर्व मंत्रालये यांना हा आदेश पाठविण्यात आला आहे.