सरकारची अश्वासने फसवी निघाली आहेत – दिलीप वळसेपाटील
![# Covid-19: Home Minister Dilip Walse Patil infected with corona; Positive for the second time in a year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/dilip-walse-patil-031.jpg)
माणसांचं इमान विकत घेण्याचा पॅटर्न जळगाव जिल्ह्याने पाहिला आणि तो भाजपाने राबवला असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी चाळीसगावच्या जाहीर सभेत केला. मोदींना त्यांच्या विचारांना हटवायचं असेल तर आपण चाळीसगावमध्ये काय करणार हे स्पष्ट केले पाहिजे असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
परिवर्तन करायचं असेल तर निर्धार तालुका आणि गावापासून करुन आघाडीला यश मिळवून द्या असे आवाहनही दिलीप वळसे पाटील यांनी केले. आपल्या विचाराने देश व राज्य कसा घडला हे आपण विसरलो आहोत. या सरकारने दिलेल्या आश्वासनांना भुललात परंतु ही आश्वासने फसवी निघाली आहेत असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्या टप्प्याची सुरुवात नाशिक जिल्हयातून झाली असून सातवी सभा चाळीसगाव येथे प्रचंड गर्दीमध्ये पार पडली. या सभेत महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राजू देशमुख यांनी आपले विचार मांडले. या सभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्या टप्प्यातील सभेला माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर,विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष नानासाहेब पगार,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बेलकवडे जलसिंचन सेलचे राजेंद्र जाधव आदींसह चाळीसगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.