सरकारचा लोकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला : आमदार जयंत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/NCP-Press.jpg)
मुंबई । महाईन्यूज ।प्रतिनिधी ।
इस्त्राइली स्पायवेअर, पेगॅससचा उपयोग करून एनएसओ ग्रुपने भारतातील अभ्यासक, दलित कार्यकर्ते, वकील आणि पत्रकारांचे फोन हॅक करून त्यांच्यावर हेरगिरी केल्याची बाब उघड झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. प्रसार माध्यमातून स्निस्फिंगचा प्रकार वाढत आहे. एनोसो कंपनीमार्फत देशातील काही लोकांची माहिती काढली गेली आहे, त्याच्या बातम्या जागतिक स्तरावर आल्या आहेत. पाळत ठेवण्यात येणाऱ्या ४० लोकांची नावे उघड करण्यात आली आहेत. त्यामध्ये १४ लोक महाराष्ट्रातील आहेत. परंतु ही मर्यादीत यादी आहे. लोकांची अंतर्गत माहिती काढण्याचे, फोनद्वारे त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम सुरू आहे. याची माहिती केंद्र सरकारला मे महिन्यापासून होती. केंद्र सरकारने कुणाला मान्यता दिली होती का, कुणाच्या आदेशाने पाळत ठेवण्यात आली याची माहिती समोर आली पाहिजे. त्यामुळे सरकारने याबाबत खुलासा करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.
अशाप्रकारे लोकांच्या फोनमधील माहिती मिळवून, दबाव आणण्याचे काम सरकारकडून होतेय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे लोकांच्या खासगी जीवनावर सरकारी अतिक्रमण आहे, व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे. याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचेही पाटील म्हणाले.
याआधी अशा घटना घडल्या त्यावेळी तत्कालीन सरकार पडले हा इतिहास आहे. स्व. राजीव गांधी यांच्या घराबाहेर पाळत ठेवण्यात आली तेव्हा माजी चंद्रशेखर यांचे सरकार पडले. त्यामुळे या प्रकरणातील जबाबदारी केंद्र सरकारने टाळू नये. आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा जबाबदारी स्वीकारून सरकार बरखास्त करावे, अशी मागणी पाटील यांनी केली. या पत्रकार परिषदेस राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सरचिटणीस अमोल मिटकरी, प्रवक्ते महेश तपासे आदी उपस्थित होते.