breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

श्वानाने अस्वच्छता केल्यास मालकांना दंड

५०० रुपये आकारण्याचा पालिकेचा निर्णय

सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पदपथांवरील अस्वच्छतेस कारणीभूत ठरणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या मालकांमध्ये पुढील आठवडाभर स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मात्र त्यानंतरही स्वच्छतेबाबत उपाययोजना न करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या मालकांवर १० डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

अनेक श्वानप्रेमी मुंबईकरांनी निरनिराळ्या प्रजातींचे कुत्रे पाळले असून दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते श्वानांसोबत फेरफटका मारण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जातात. समुद्रकिनारे, उद्याने, मैदानांत पाळीव कुत्र्यांसह फेरफटका मारताना अनेक जण दृष्टीस पडतात. फेरफटका मारताना कुत्रे रस्त्यातच मल-मूत्र विसर्जित करतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पदपथ अस्वच्छ होतात. याची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे.

पाळीव श्वानांच्या मालकांमध्ये पुढील आठवडाभर जनजागृती करण्याची सूचना अजोय मेहता यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली आहे. आठवडाभर प्रबोधन केल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर १० डिसेंबरपासून कुत्र्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश मेहता यांनी विभाग कार्यालयांमधील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

कुत्र्यांना फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाताना संबंधितांनी ‘पूप स्कूपर’ सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे आणि त्याची माहिती मालकांना देण्यात येणार आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि ‘पूप स्कूपर’ सोबत न ठेवणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button