शिवसेना खासदार संजय राऊत उद्या दिल्लीला जाणार
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आणि अभिनेत्री कंगना राणावतमध्ये प्रचंड वाद सुरु आहे. दरम्यान, त्यांनी कंगनावर केलेल्या टीकेनंतर कंगना काल (९ सप्टेंबर) मुंबईत आली आहे. ती मुंबईत येऊ नये यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई विमानतळावर आंदोलन करण्यात आले. तर करणीसेनेने तिचे समर्थन केले. अशातच दिल्लीतील संजय राऊत यांच्या निवासस्थानावर करणीसेनेने काळा रंग फासला आहे. त्यानंतर दिल्लीतील त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याच साठी उद्या (११ सप्टेंबर) संजय राऊत दिल्लीला जाणार आहेत.
दरम्यान, संजय राऊत सध्या मातोश्रीवर असून त्यांच्यात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात महत्वाची बैठक सुरु आहे. कंगना प्रकरणी पुढे काय पाऊल शिवसेना उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, काल (९ सप्टेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही कंगना राणावत प्रकरणावर चर्चा झाली. कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर सर्व स्तरांतून कंगनाला विरोध केला जात आहे. मात्र, तरीही कंगना ट्विट करत शिवसेनेला, सरकारला, मुख्यमंत्र्यांना निशाणा करत टीका करत आहे.