शिराळा तालुक्यामध्ये काँग्रेस ‘हिरो’… सर्वाधिक ग्रामपंचायतींवर मारला ‘हात’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Satyajit.jpg)
- युवा नेते सत्यजित देशमुख यांची यशस्वी कामगिरी
- आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी
शिराळा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते सत्यजित देशमुख यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेसने ‘हात’ मारला असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला आव्हान निर्माण केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केलेल्या फकीरवाडी, चिखलवाडी येथील नूतन सरपंच, ग्रामपंचायत नूतन सदस्यांचा सत्कार शिराळा येथील कार्यालयात करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले की, शिराळा तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. तालुक्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक १० ग्रामपंचायतीवर सत्ता मिळाली आहे. दोन ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य संख्या जास्त आहे. परंतु सरपंचपदाचे उमेदवार अत्यंत अल्प मताने पराभूत झाले आहे. ग्रामपंचायत पहिल्या टप्प्यामध्ये १९ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली होती. आता १० ठिकाणी यश मिळाले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील जनता कॉंग्रेस पक्षावर प्रेम करते हे सिद्ध झाले आहे.
यावेळी चिखलवाडी सरपंच कांचन देसाई, फकीरवाडी सरपंच सिंधुताई दशवंत, रिजवाना मुल्ला, रोशन मुल्ला, संदीप कर्ले, नदिम पटेल, मुस्कान मुल्ला, कासम मुल्ला, बादशा मुल्ला, विजय कर्ले, जगन्नाथ देसाई यांच्यासह ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.