breaking-newsमहाराष्ट्र

शासनाकडून लेखी आश्वासनानंतरच अफवांच्या बळींवर अंत्यसंस्कार

  • मंगळवेढय़ात उत्स्फूर्त बंद

सोलापूर – धुळे येथे लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवांतून जमावाने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मंगळवेढा तालुक्यातील नाथपंथीय डवरी गोसावी समाजाच्या पाचजणांचे मृतदेह मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कारासाठी मंगळवेढा तालुक्यात त्यांच्या गावी आणण्यात आले. परंतु शासनाकडून जोपर्यंत लेखी स्वरूपात न्याय देण्याचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार न करण्याचा आक्रमक पवित्रा मृतांच्या नातेवाइकांनी घेतला होता. अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी समक्ष येऊन शासनाकडून लेखी आश्वासन दिल्यानंतरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार उरकण्यात आले.

दरम्यान, धुळे जिल्ह्य़ात अफवांचे बळी ठरलेल्या मंगळवेढा तालुक्यातील पाच निष्पाप जिवांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मंगळवारी ‘मंगळवेढा बंद’ पाळण्यात आला. दुपारी उशिरापर्यंत व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून मृतांना श्रध्दांजली वाहिली, तसेच धुळ्यातील अमानुष घटनेचा तीव्र शब्दात निषेधही नोंदविला. बंदच्या काळात मंगळवेढय़ातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. शाळा व महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती.

मंगळवेढा तालुक्यातील खवे व मानेवाडी येथील नाथपंथीय डवरी  गोसावी समाजाचे गरीब कुटुंब भीक मागण्यासाठी धुळे जिल्ह्य़ात गेले असताना त्याठिकाणी लहान मुले प़ळविणारी टोळी आल्याची अफवा पसरून त्यात या नाथपंथीय डवरी गोसावी समाजातील निष्पाप  पाच जणांचा जमावाच्या अमानुष हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे इकडे मंगळवेढा भागात नाथपंथीय डवरी गोसावी समाजात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, काल सोमवारी, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी तातडीने मंगळवेढय़ात धाव घेऊन नाथपंथीय डवरी गोसावी समाजाच्या बांधवांची बैठक घेऊन त्यात मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाखांची आर्थिक मदत, शासकीय सेवेत नोकरी व कायम स्वरूपी पुनर्वसन आदीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पालकमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे या बैठकीस संवाद करायला लावला होता.

या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सकाळी धुळे येथून पाचपैकी चार मृतदेह मंगळवेढा तालुक्यात तर एक मृतदेह कर्नाटकातील इंडी (जि. विजापूर) येथे अंत्यविधीसाठी नेण्यात आला. मंगळवेढा तालुक्यातील खवे येथे तीन तर मानेवाडीत एक मृतदेह अंत्यविधीसाठी आणला गेला तेव्हा  मृतांच्या नातेवाइकांत पुन्हा संतापाची लाट उसळली.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाखांची शासकीय मदत मिळावी, शासकीय सेवेतील नोकरीसह कायम स्वरूपी पुनर्वसन व्हावे अशा मागण्यांसाठी नातेवाइकांनी मृतदेहांवर अंत्यविधी अडवून ठेवला होता. अखेर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रत्यक्ष तेथे येऊन लेखी आश्वासन दिले. या वेळी आमदार भारत भालके यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नाथपंथीय डवरी गोसावी समाजाचे नागरिक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button