शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने निवडून येणार : सुरेश धस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Suresh-Dhas-.jpg)
बीड : उस्मानाबाद-बीड-लातूर या जागेसाठी होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शंभर ते दीडशे मतांच्या अंतराने निवडून येऊ, असा दावा भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केला. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीनही जिल्ह्यांमध्ये भाजपला चांगले मतदान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने गुप्त मतदान पद्धतीचे उल्लंघन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांच्या हातात घड्याळ घातले, काहींना किचन दिले, तर काहींच्या शर्टवर चिप्स लावले, असा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा यामध्ये समावेश आहे. या निवडणुकीत महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपरिषदेचे सदस्य, नगरपंचायतीचे सदस्य मतदान करतात.