लोणावळ्यात उंट सवारीच्या पैशावरून वाद; पर्यटकांना बेदम मारहाण
लोणावळ्याच्या टायगर पॉईंट येथे व्यापाऱ्याने पर्यटकांना बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. उंटाची सवारी केल्यानंतर पैसे घेण्यावरून हा वाद झाला. या वादात आसिफ मोतीवाला, अहमद मेमन, सुफीयान मेमन, रईसा मेमन आणि नसर मेमन हे पाच पर्यटक जखमी झाले असून काहींच्या पाठीवर मारहाणीचे व्रण उमटले आहेत. मात्र अद्याप मारहाण केलेल्या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाहीत. हे प्रकरण लोणावळा ग्रामीण पोलिसांपर्यंत पोहचले असून अधिकचा तपास सुरू आहे.
हे पाच पर्यटक गुजरातहून लोणावळाच्या टायगर पॉईंट येथे आले होते. त्यांच्यासोबत असलेल्या बच्चेकंपनीने हट्ट धरल्यानंतर त्यांनी उंटाची सवारी केली. पण उंटाची सवारी झाल्यानंतर मात्र उंट व्यापाऱ्याने ठरल्यापेक्षा अधिक पैसे सांगितले आणि यावरून वादाला सुरुवात झाली. वाद विकोपाला गेला आणि त्यातच एकाने असिफ मोतीवाला यांच्यात डोक्यात काचेची बाटली फोडली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर मेमन कुटुंबाला व्यापाऱ्यासह स्थानिक नागरिकांनी पाईप, काठी आणि काचेच्या बाटल्यांनी मारहाण केली. या मारहाणीत ९२ हजार रुपयांच्या किंमती वस्तू गहाळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेतील जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पर्यटनस्थळी राज्याबाहेरील पर्यटक सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.