breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

लोकसभा विसरा, विधानसभेच्या कामाला लागा – शरद पवार

देशाचे होत असलेले ऐक्य लक्षात घेता हे सरकार जाईल असं वाटलं होतं. परंतु पंतप्रधान मोदींनी केलेली आक्रमक भाषणे तरुण पर्यंत पोहचली. त्यामुळे आज वेगळे चित्र पहायला मिळाले आहे. आपणही शेतकरी, एकजुट हे विचार मांडले मात्र त्यांनी मांडलेले विचार जनतेला पटल्याने त्यांना यावेळी जास्त जागा मिळाल्या. मात्र आता आपल्याला आगामी विधानसभेला सामोरे जायचे आहे. लोकसभेचा काय निकाल लागला हे डोक्यातून काढा. आपला पक्ष आपला उमेदवार जनमानसात कसा पोहचेल यासाठी सर्वांनी खबरदारी घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज (शनिवार) पार पडली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, मधुकरराव पिचड, आमदार छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर,माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी पवार म्हणाले की, आज देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. शेती व शेतीव्यवसायातील अपयश असेल किंवा शेतकरी आत्महत्या असतील, महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्याचे चित्र होते. ते मतदानातून व्यक्त होईल अशी अपेक्षा होती. परंतु मोदींनी सर्वांचा प्रचाराचे सुत्र दुसरीकडे वळवले. लोकांच्या भावनेला आवाहन करुन प्रखर राष्ट्रवाद वाढवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी मोदी सरकारने कशापध्दतीने यंत्रणा वापरली किंवा कशापध्दतीने आता आपल्याला काम करायला हवे याबाबत माहिती दिली. तसेच, या आगामी निवडणुकात तरुण चेहर्‍याना संधी दिली जाणार असल्याचे सुचक विधानही त्यांनी केले.

विधानसभेला, जिल्हा परिषदेला लोकं वेगळा विचार करतात. खचून न जाता कामाला लागा. असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले. येत्या निवडणुकीत मतदारसंघाची जबाबदारी नेत्यांकडे देणार आहोत असेही जयंतराव यांनी स्पष्ट केले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं स्वतः च अस्तित्व ठेवणार आहे. त्यामुळे विलिनीकरण होणार नाही.विरोधकांकडून बातम्या पसरवल्या जात आहे. यामध्ये तथ्य नाही हे सर्वांनी सांगितले पाहिजे असे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन करताना आवाहन केले.जनता लोकसभेला वेगळा विचार करते तसा विधानसभेला वेगळा विचार करेल असा विश्वासही अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button