लोकपाल आणि हमीभावासाठी अण्णा हजारेंचे ‘उपोषणास्त्र’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/anna-hazare-1.jpg)
राळेगणसिध्दी – लोकायुक्त नेमण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतरही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. लोकायुक्ताबाबत सरकारने अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा तसेच शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा यांसारख्या मागण्यांसाठी अण्णा आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीपासून उपोषणाला बसले आहेत. लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णांनी हे आंदोलन सुरु केले आहे.
अण्णांनी बुधवारी सकाळी १० वाजता यादवबाबांचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली. यादवबाबा मंदिराबाहेर उभारलेल्या व्यासपीठावरून अण्णा हजारे यांनी पुन्हा भारत माता की जय… जय हिंद… इन्कलाब जिंदाबादचा हुंकार दिला.
‘हे माझे उपोषण कोणत्याही व्यक्ती, पक्षाविरुद्ध नाही. समाज आणि देशाच्या भल्यासाठी मी सातत्याने आंदोलन करत आलो आहे. हे त्याच प्रकारचे आंदोलन आहे’ असे अण्णा हजारे यावेळी म्हणाले. लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. याविषयी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने सरकारचे अभिनंदन करत आहे. कायदा तर विधानसभेत बनतो. त्यामुळे विधासभेत हा प्रस्ताव मंजूर होऊनच कायदा बनने गरजेचे आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकार अध्यादेश काढत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.’
दरम्यान, या आंदोलनात सहभागी होण्याआठी देशभरातून अण्णा हजारे यांचे समर्थक मोठ्या संख्येने राळेगणसिध्दी येथे येण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी राळेगणसिध्दीमध्ये ग्रामस्थ एकवटले आहेत.