लक्ष्य विधानसभा 2019, महाराष्ट्र वाट पाहतोय: आदित्य ठाकरे लवकर निवडणुकीच्या रिंगणात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/160865c1b7e93f2d551b235fcc0f2c11_342_660.jpg)
मुंबई – लोकसभेच्या घवघवीत यशानंतर आता विधानसभेच्या दृष्टीने युतीने तयारी सुरु केली आहे. त्यातच शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रहाची मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत कोणीही निवडणूक लढवलेली नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणुक लढवणार नसल्याचे म्हटले होते. पण आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात याआधीच स्पष्ट केले होते की, निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरे यांचाच असेल.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवरुन ही मागणी केली आहे. वरुण हे आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू देखील आहेत, त्यांनी इंस्टाग्रामवरून ही मागमी केली आहे. ‘हीच वेळ आहे..हीच संधी आहे.. लक्ष्य – विधानसभा २०१९ !! महाराष्ट्र वाट पाहतोय’, असा उल्लेख करत त्यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग देखील केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. विधानसभेसाठीच्या याबैठकी आधीच आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढवण्यासंदर्भातील बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात निवडणूक लढवण्यासंदर्भातील मोठी घोषणा केली जाऊ शकते.
आदित्य ठाकरे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर ते कोणत्या मतदारसंघातून लढतील याबाबत देखील चर्चा सुरु झाली आहे. युवासेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे पूर्व हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी योग्य ठरू शकतो. याच मतदारसंघात ते राहतात. तसेच या भागात त्यांचे काम देखील आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यासाठी वांद्रे पूर्व हा मतदारसंघावर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता आहे. अर्थात यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता आदित्य ठाकरे कोणता निर्णय घेतील याकडे लागले आहे.