राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्यांची निवड
मुंबई |महाईन्यूज|
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन करुन शिवसेना-काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आणखी मजबूत करण्यात येणार आहे. याकरिता माथाडी कामगार नेते व माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव जवळपास निश्चित झाले आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करण्यात शशिकांत शिंदे यांचा मोठा वाटा होता. मात्र, त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून, त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद आहे.
त्यामुळे जयंत पाटलांचे उत्तराधिकारी म्हणून शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार हे निश्चित आहे. या पदाच्या शर्यतीत जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांचेही नावे होती. पण, पश्चिम महाराष्ट्रात ताकद असलेल्या राष्ट्रवादीने शिंदे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिपद मिळणाऱ्या नेत्यांना पक्ष संघटनेच्या कामासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याने शशिकांत शिंदे यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे दिसत आहे.