breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
राष्ट्रवादीची लोकसभेची आजपासून तयारी
- शरद पवार यांच्याकडून मतदारसंघनिहाय आढावा
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, पक्षाध्यक्ष शरद पवार हे उद्यापासून दोन दिवस मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. गेल्या वेळी काँग्रेसने लढलेल्या पाच मतदारसंघांचा राष्ट्रवादीकडून आढावा घेतला जाणार आहे.
काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे राष्ट्रवादीने निश्चित केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेसलाही आघाडीची आवश्यकता आहे. २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने लोकसभेच्या २२ जागा लढविल्या होत्या. या सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय काँग्रेसने गेल्या वेळी लढविलेल्या चार ते पाच मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा डोळा आहे. अदलाबदलात काही मतदारसंघ मिळावे, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. यामुळेच यवतमाळ, सांगली यासह आणखी दोन मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीचे खासदारांचे संख्याबळ वाढावे, असा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यातूनच पक्षाला अनुकूल ठरतील अशा मतदारसंघांवर दावा केला जाईल, असे सांगण्यात आले. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मतदारसंघनिहाय स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. जिल्ह्य़ातील नेत्यांची मते अजमावून घेतली जातील. तसेच कोणाला उमेदवारी देण्यात यावी याची चाचपणी केली जाईल.