breaking-newsमहाराष्ट्र

रायगडावर चेंगराचेंगरी; दगड अंगावर पडल्याने तरुण ठार

रायगड – रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानंतर गड उतरत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत व त्यातच डोंगरावरून आलेल्या दगडाने एक शिवप्रेमी ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. गड उतरत असताना महादरवाजाजवळ अरुंद वाटेमुळे गर्दी आटोक्‍यात न आल्याने ही घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर महादरवाजा बंद करण्यात आल्याने अनेक शिवप्रेमींना रायगडावरच थांबावे लागले आहे.

अशोक उंबरे (वय 19, रा. उळूप, ता. भूम, जिल्हा उसमानाबाद )असे या मयत शिवप्रेमीचे नाव आहे. त्याच्या सोबत चालत असलेल्यांपैकी मंदा मोरे (वय 45 रा. सोलापूर), सोनाली गुरव (वय 30 रा.सातारा), अमोल मोरे (वय 23, रा. हडपसर), रामदेव चाळके (वय 39), अभिजित फडतरे (वय 23 सातारा), निलेश फुटवळ (वय 35), अमित महांगरे (वय 24, रा. खेड शिवापूर) हे जखमी झाले आहेत.

रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रचंड गर्दी उसळली होती. लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी गडावर आलेले होते. या सर्वांनाच रोपवेची सुविधा न मिळाल्याने अनेकांनी गड पायी चढउतार केला. हा सोहळा दुपारी आटपून शिवप्रेमी गड उतरत होते. गर्दी इतकी होती की पाऊलवाटा व पायऱ्यांवरून उतरणेही अवघड झाले. चित्त दरवाजा ते हत्ती तलावपर्यंत शिवप्रेमीची रांग दिसत होती.

शिवराज्याभिषेकदिन सोहळा सुरु असताना पायी येणाऱ्यांची गर्दी आणि गड उतरणाऱ्याची गर्दी यामुळे अरुंद पायवाट आणि पायऱ्या यामुळे खुबलढा बुरुज, महादरवाजा, याठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा घटना घडल्या. याच दरम्यान महादरवाजा ते खुबलढा बुरुज परिसरात डोंगरावरून आलेल्या दगडाने एकाचा प्राण घेतला, तर सात जण जखमी झाले. जखमींना तातडीने पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

रायगडावर झालेल्या गर्दीने दुपारी रायगडावर शिवप्रेमींना थांबवण्यात आले. गडाचा महादरवाजा बंद करण्यात आला. यामुळे दोन्ही बाजूला मोठी गर्दी उसळली. प्रत्येक जण गड उतरण्याच्या दिशेने असल्याने अनेकांनी रायगडाच्या तटबंदीवर चढून उतरण्याचा प्रयत्न केला. यामुळे भयभीत झालेले शिवप्रेमी सुरक्षित स्थळी जाण्याच्या प्रयत्न करू लागल्याने चेंगराचेंगरी होत होती. गर्दीपुढे पोलीस प्रशासन देखील हतबल झाले. गेली दोन दिवस जमलेल्या गर्दीचा अंदाज पोलीस प्रशासनाला न आल्याने ही घटना घडली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button