breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राज ठाकरेंच्या भाषणानंतर उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना मुंबई आणि महाराष्ट्रात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. उत्तर भारतीय महापंचायत समितीने हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत रोजगार देत नाही तोपर्यंत नेत्यांना प्रवेश करु देणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत भाषण केलं आणि आपली बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये रोजगार उपलब्ध न होण्याला तेथील नेते जबाबदार असल्याची टीका केली.

उत्तर भारतीय महापंचायत समितीने जाहीर केल्यानुसार, जोपर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रोजगार आणि उद्योगधंदे उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कोणत्याही आमदार आणि खासदाराला मुंबई, महाराष्ट्रात प्रवेश करु देणार नाही. आमच्या लोकांना येथे येऊन अपमान सहन करावा लागतो. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा निर्णय घेत आहोत.

काय बोलले राज ठाकरे –
जर अन्य राज्यातून गुन्हेगार येथे येणार असतील तर राज ठाकरे अजिबात सहन करणार नाही. बाहेरचे टॅक्सीवाले आमच्या आयाबहिणींची छेड काढतात, मग आम्ही गप्प बसायचे का ?आमच्या आया बहिणी उघड्यावर पडलेल्या नाहीत अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना त्यांच्याच मंचावरुन सुनावलं.

राज ठाकरे यांनी हिंदीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितल की, फक्त तुमचा प्रश्न असता तर मराठीत बोललो असतो. पण हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमधील लोक पाहणार आहेत अस सांगितल्याने हिंदीत बोलत आहे. उत्तर प्रदेशमधील लोकांमध्ये काही गैरसमज आहेत, काही आंदोलनं झाली, मारहाण झाली यावर काही प्रश्न आहेत. तुम्ही येऊन त्यांच्याशी बोललात तर बरं होईल अशी विनंती केल्यानेच मी आमंत्रण स्विकारल्याचा खुलासा त्यांनी केला.

 

सत्य कटू असतं पण तुम्ही ते समजलं पाहिजे. मी शाळेत असल्यापासून हिंदी चांगलं आहे. माझ्या वडिलांचं उर्दू चांगलं होतं, त्यांच्यामुळे माझं हिंदी चांगलं आहे. दुसरं कारण म्हणजे चित्रपट. हिंदी भाषा चांगली आहे त्यात दुमत नाही, पण ती राष्ट्रभाषा आहे हे चुकीचं. राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालेलाच नाही असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

पहिल्यांदा आपण आपला देश समजला पाहिजे. आपल्या देशाची राज्यघटना, कायदा काय सांगतो हे समजलं पाहिजे, त्यामुळे इतर गोष्टी सहज होतील. या देशातील व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो असं म्हटलं जातं. पण आंतरराज्य कायदा कोणी वाचला आहे असं वाटत नाही. एक राज्य सोडून येता तेव्हा तुम्हाला पोलीस ठाण्यात जाऊन सर्व माहिती देणं गरजेचं असतं. एका राज्यातून आले आणि दुसऱ्या राज्यात गेले असं होत नाही. येथूनच खरी समस्या निर्माण होते असं सांगताना मी स्पष्टीकरण देण्यास आलेलो नाही, फक्त माझी भूमिका हिंदीतून सांगण्यासाठी आलो आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरेंना रेल्वे परीक्षेदरम्यान झालेली मारहाण, फेरीवाले यावर प्रश्न विचारण्यात आले होते. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, जर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध आहे, तर येथील तरुणांना प्रथम संधी मिळाली पाहिजे यामध्ये काय चुकीचं आहे. उद्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये इंडस्ट्री जात असेल तर तेथील लोकांना प्राथमिकता दिली पाहिजे असं पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितलं.

उद्योगधंदे आणू न शकणारे उत्तर प्रदेशचे नेते अयशस्वी आहेत. जे पंतप्रधान झाले त्यातील 70 ते 80 टक्के उत्तर प्रदेशचे होते. तुम्ही जे प्रश्न आहेत ते त्यांना का विचारत नाहीत. पंतप्रधान पदासाठी मतदारसंघ चालतो मग रोजगार का मिळत नाही. याचं कोणाकडेही उत्तर नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.

माझ्या राज्यात मराठी तरुण-तरुणींना प्राथमिकता दिली पाहिजे, उरले तर इतरांना द्या. एखाद्या राज्यात गेल्यानंतर त्याचा आदर केला पाहिजे. परदेशात गेल्यानंतर हिंदीत बोलतो का ? महाराष्ट्रात जे झालं त्याचं जे चित्र निर्माण कऱण्यात आलं ते इतर राज्यांच्या बाबतीत का नाही झालं. गोव्याचे मंत्री रवी नाईक यांनी भिकाऱ्यांची ट्रेन नको असं म्हणत बिहार ट्रेनला विरोध केला होता. तेव्हा कोणाचं रक्त उसळलं नाही, तेव्हा कोणी प्रश्न विचारला नाही. आसाममध्ये तर बिहारींची हत्या करण्यात आली होती. तिथे मोठं आंदोलन झालं होतं. त्याचंही काही झालं नाही. त्याबद्दलही कोणी बोलत नाही असं सांगत राज ठाकरेंनी आपल्याला टार्गेट केला जात असल्याचा आरोप केला.

एक महिन्यापूर्वी तर बिहारींना गुजरातमधून हाकललं होतं. 10 ते 15 हजार लोक मुंबईत आले. कोणत्याही राज्यातून हाकललं की मुंबईत येतात. आधीच ओझं कमी आहे का आमच्या राज्यावर. पण हा प्रश्न कोणी नरेंद्र मोदींना विचारत नाही असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

रेल्वे आंदोलनासंबंधी बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, रेल्वेच्या नोकरीची जाहिरात महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्रात आली नव्हती. सर्व जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आल्या होत्या. आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. आमचे लोक भेटण्यासाठीही गेले होते. चर्चेसाठी आमचे लोक गेले ती भाषा ऐकून तुम्हीही खवळला असता. आमचे लोक काय हातावर हात ठेवून बसणार का ? उद्या मराठी लोकांनी उत्तर प्रदेशात जाऊन अशी भाषा वापरली तर तुम्ही आरती काढणार का ? असे सवाल राज ठाकरेंनी विचारले.

तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अपमानित होता असं वाटत नाही. तुमचा स्वाभिमान कुठे आहे….तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न का विचारत नाही अशी विचारणा राज ठाकरेंनी उपस्थितांना केली.

उत्तर प्रदेशातील लोक कमी पगारावर नोकरी करतात मराठी करतील का असा प्रश्न मला विचारण्यात आला आहे. चला मी दाखवतो तुम्हाला. मराठी लोक कायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत. फेरीवाला आंदोलन झाल्यानंतर अनेक मराठी लोकही माझ्याकडे आले. त्यावेळीही वापरण्यात आलेली भाषा चुकीची होती. काही नेते भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला.

महाराष्ट्रात इतके उद्योग का येत आहेत याचा विचार तुम्ही केला पाहिजे. उद्योग उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेले पाहिजेत असं मला वाटत आहे. पण तुम्ही सगळे इथे येतात. प्रत्येक राज्याची एक क्षमता असते, जर ती ओलांडली तर इथे राहणाऱ्यांनी काय करायचं. महाराष्ट्र पोलिसांना त्यांचा सर्वात जास्त वेळ कुठे जातो विचारा. जे गुन्हे होत आहेत त्यांचा तपास उत्तर प्रदेश, बिहार सीमारेषेवर सुरु आहे. इथे गुन्हा करतात आणि तिथे पळून जातात. 1995 मध्ये महाऱाष्ट्रात एक स्कीम आली झोपडपट्टीवासियांना मोफत घरं….त्यानंतर परिस्थिती बदलली असं राज ठाकरे यावेळी बोलले.

एवढी गर्दी झाली आहे की तुमच्या लोकांना सांगा आता नका येऊ अशी सूचना करताना जिथे जाल त्या राज्याचा मान राखा असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. नरेंद्र मोदी आल्यापासून सगळं बदललं नाही. मुख्यमंत्री असताना त्यांची भाषा वेगळी होती, आता त्यांची भाषा वेगळी आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.

तुम्ही तुमच्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. ऐकत नसतील तर आम्ही आहोतच. ही दादागिरीची भाषा नाही आहे. राज्यांमध्ये मैत्रीपूर्ण स्पर्धा असली पाहिजे. प्रश्न तिरस्कार करण्याचा नाहीये, पण ती वेळ येऊ नये. महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची प्रगती व्हावी हीच माझी इच्छा असं सांगत राज ठाकरेंनी भाषणाची सांगता केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button