राज्यात पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई – मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात श्रावण सुरू झाल्यापासून पावसाने पुनरागमन केले आहे. काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी आता पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू आहे. पण पुढच्या २४ तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. तर पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर पुढच्या ४८ तासांत मराठवाडा व इतर शहरांमध्ये मध्यम, जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.