राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ वर
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
मुंबईत १,२७५, पुण्यात ३,५४४ नवे रुग्ण
मुंबई – महाराष्ट्रात काल एका दिवसात १४ हजार ४९२ नव्या कोरोनाबाधित आणि ३२६ मृत्यूंची नोंद झाली. तर १२ हजार २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता ४ लाख ५९ हजार १२४ इतकी झाली असून बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्क्यांवर गेले आहे. त्याचबरोबर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६ लाख ४३ हजार २८९ वर पोहोचली असून प्रत्यक्षात १ लाख ६२ हजार ४१९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत २१ हजार ३५९ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गुरुवारी १ हजार २७५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३२ हजार ८१७ इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा ७ हजार ३११ वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात ९७६ जण कोरोनावर मात करून घरी परतले. यासह मुंबईत आतापर्यंत १ लाख ७ हजार ३३ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या १८ हजार १७० रुग्ण उपचार घेत आहेत.
पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात नव्या कोरोना रुग्णांनी दुसऱ्यांदा साडेतीन हजार रुग्णांचा आकडा क्रॉस केला. काल दिवसभरात जिल्ह्यात ३ हजार ५४४ नवे कोरोना रुग्ण आढळले. यात पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ६६९ रुग्णांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात तब्बल ७१ कोरोना रुग्णांनी आपले प्राण गमावले. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख ३५ हजार ८३७, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख २ हजार ८५१, तर कोरोनाबळींची संख्या ३ हजार ३६१ इतकी झाली आहे.